तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
श्रीमद् भागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने श्रीमद् भागवत कथा ऐकली पाहिजे यामुळे आपल्या जीवनातील व्यथा संपतात असे प्रतिपादन ह.भ.प.जगदिशानंद महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.
स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुशी (व) येथे वै.महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत शिवाजी महाराज, नारायणगडकर यांच्या प्रेरणेने, महंत दत्तात्रय महाराज गिरी व ह.भ.प. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित श्रीमद् भागवत कथेत भागवताचार्य जगदिशानंद महाराज शास्त्री बोलत होते. दरम्यान भागवत कथेमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तर कथेसाठी पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांची लक्षणीय गर्दी आहे.
पुढे बोलताना जगदिशानंद शास्त्री म्हणाले की श्रीमद् भागवत कथा आनंदाचे रहस्य आहे. प्रत्येकाने भागवत कथेत आले पाहिजे तसेच आपण आपल्या क्षेत्रात जे काम करता ते इमानेइतबारे करा हेच खरे कर्म असून हिच खरी पुजा आहे.तर जीवनात नैतिकता ठेवा, निती शिवाय समाधान मिळत नाही. वाणी आणि स्वभाव चांगला ठेवा भगवंत कायम तुमच्या पाठीशी राहतो तसेच
संत म्हणतात वाईट गोष्टींचा त्याग करणं हा सुद्धा चांगला एक गुण आहे. आई- वडीलांची सेवा करा ते शेवट पर्यंत आपल्यासाठी धरपडत असतात. पृथ्वीला पापाचे आणि खोटे बोलणाऱ्यांचे सध्या वजन आहे. नवरा आणि मुलगा निव्यर्सनी आहे तिच माता आज सर्वात सुखी आणि श्रीमंत आहे. दुसऱ्याचं सुख पाहण्यात जो समाधानी आहे तोच खरा सुखी आहे. ध्यानाने भगवंत प्रसन्न होतात म्हणून देवाचे नामस्मरण करुन जप करा. पन्नाशी आधी गुरुमंत्र घेवून पन्नाशी नंतर प्रत्येकाने भजन, जप करुन ध्यान धारणा केली पाहिजे. भजन भगवंतांची प्राप्ती करुन देते. तसेच प्रत्येकाने मनात एक संकल्प केला पाहिजे जीवनात कुणाचेही वाईट करणार नाही. म्हणजे भगवंत आपलेही वाईट करत नाही. चांगले कर्म करा त्रास होणार नाही. जे पेराल तेच उगवते म्हणून जीवनात चांगले पेरा जीवनात जे आपल्या वाट्याला आले ते नक्की घ्या परंतू कुणाचीही लुबाडून घेवून नका असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला. तर सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच सुशी येथील तरुण मंडळी व सप्ताह कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.
Social Plugin