Ticker

6/recent/ticker-posts

सांगवीतील देवस्थान इनाम जमीन देवस्थानच्या नावावर पूर्ववत


रमेश उबाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सामान्य शेतकऱ्याला मिळाला न्याय, सातबारा उताऱ्यावर झाली नोंद



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सांगवी, ता. कोरेगाव येथील देवस्थान इनाम जमिनीचा निकाल व कब्जा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते. या संदर्भात शेतकरी प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी त्याला न्याय मिळवून दिला. संबंधित जमीन आता देवस्थानच्या नावावर पूर्ववत झाली असून निकम यांनी समाधान व्यक्त करत रमेश उबाळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांचे ऋण कधीही विसरू शकत नाही. जातीय भेदभाव न करता उबाळे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि देवस्थानला न्याय मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सांगवी येथील ग्राम महसूल अधिकारी यांनी सातबारा उताऱ्यावर देवस्थानच्या नावाची नोंद करून दिली आहे. याबाबतची माहिती शेतकरी  प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम  यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना या विषयाची सविस्तर माहिती दिली.

आमच्या देवस्थानच्या नावाची नोंद काढण्यात आली होती. सातबारा उताऱ्यावर देवस्थानची पुन्हा एकदा नोंद व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आणि सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत होतो, मात्र आमची दाद लागत नव्हती. रमेश उबाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी आम्हाला विश्वास दिला. आम्हाला न्याय देण्याचा शब्द दिला. त्यानुसार त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी या संदर्भात देवस्थानचे नाव जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर लावण्याचा आदेश काढला होता.

मात्र या आदेशाची लवकर अंमलबजावणी होत नव्हती. रमेश उबाळे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आणि तातडीने ग्राम महसूल अधिकारी यांनी देवस्थानची नोंद सातबारा उताऱ्यावर केली. कुमठे चे मंडलाधिकारी यांनी ती नोंद कायम केली आहे. एकूणच रमेश उबाळे हे देवाच्या रूपाने आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला असल्याचे प्रल्हाद विठ्ठल अलगुडे निकम यांनी सांगितले.

रमेश उबाळे हे अत्यंत अभ्यासू आहेत. त्यांनी जातीपातीच्या व्यवस्थेच्या विरोधात जात आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी दाद मागितल्यानंतर तातडीने आमच्याकडील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आणि प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले.  त्यांनी प्रशासनाला देवस्थानची नोंद जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. रमेश उबाळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासन गतीने हलले. 

सांगवी येथील जमीन ही रामदास स्वामी देवस्थान आणि किन्हई देवस्थानची होती. सदरची जमीन कसण्यासाठी निकम कुटुंबियांकडे होती, मात्र काही वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता स्थानिक तलाठ्याला हाताशी धरून काही व्यक्तींनी खरेदीपत्र करून घेत जमीन नावावर करून घेतली गेली होती, ही बाब उबाळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. 

प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी सदरची जमीन पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घेतली. त्यानंतर या संदर्भातले आदेश काढले. 

रमेश उबाळे यांनी पाठपुरावा केल्याने आमच्या अलगुडे निकम कुटुंबियांना न्याय मिळाला असून देवस्थानची जागा देवस्थानच्या नावावरच राहिली आहे, त्याबद्दल उबाळे यांचे अभिनंदन करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.