*राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा डेरवणमध्ये जल्लोषात संपन्न*
संजय भोसले .
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी द्वारा आणि रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय मैदानी (१४,१७,१९ वर्षा आतील मुली) स्पर्धेचे आयोजन एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे दि. ०९ ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, छ. संभाजी नगर, अमरावती, नाशिक, क्रीडा प्रबोधिनी,कोल्हापूर असे एकूण ०९ विभागातील ३६ जिल्ह्यांतून अंदाजे १०७१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी असल्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन या स्पर्धेत प्रेक्षकांना अनुभवता आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संजय सबनीस (उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे), माणिक पाटील (उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर), जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदिप तावडे, तसेच क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, गणेश जगताप, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, गणेश खैरमोडे, क.लिपिक प्रणित कांबळे व स्पर्धेसाठी उपस्थित निवड समितीमध्ये गणेश जाधव, पूनम नवगिरे, बळवंत बाबर, सिमा पाटील, अविनाश पाटील, पारस पाटील, कय्युम शेख, हर्षल निकम, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले. संजय सबनीस यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेऊन सतत आपली कामगिरी उंचावण्याबाबत संबोधित केले. तसेच माणिक पाटील यांनी खेळ आणि त्या संबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजना याबाबतचे महत्व स्पष्ट करून खेळाडूंना संबोधित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.गणेश खैरमोडे यांनी केले.
स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक इव्हेंट मधील प्रविण्यप्राप्त पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचा फायदा आमच्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत ठरल्याचेही मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. एस.व्हि.जे.सी.टी. क्रीडा संकुला मध्येच खेळाडूंची उत्तम निवास भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत आम्ही निर्धास्त होतो, असेही पालकांनी आवर्जून सांगितले.
Social Plugin