नाशिक (प्रतिनिधी) अमन शेख,
जेलरोड येथे सोसायटीत वॉचमन तसेच घरकाम करणाऱ्या मोलकरीणने दिवाळीत साफसफाई करताना दोन लाख रुपये किमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे दागिने एका घरातून लंपास केले होते. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करून संशयित महिलेची कसून चौकशी करत २ लाख १२ हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
पार्थ प्रभा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लता प्रभाकर तागडे यांच्या घरी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा आटोपल्यानंतर दोन लाख १२ हजार रुपये किमतीचे सात तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले होते. दरम्यान, त्याच सोसायटीत वॉचमन म्हणून राहणाऱ्या व मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या संशयित श्रुती किरण घोडे या तागडे यांच्या घरी दिवाळीनिमित्त साफसफाई करण्याचे काम करण्यास गेल्या होत्या. घोडे यांना दागिने चोरीस गेल्यानंतर विचारपूसदेखील करण्यात आली होती.
मात्र, त्यांनी या प्रकाराबाबत नकार दिला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विजय टेमगर यांनी तपास करत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घोडे हिची तांत्रिक विश्लेषणाद्वारे अधिक विचारपूस केली असता तिने चोरीची कबुली दिली.
दोन लाखांचे दागिने केले होते गायब:
संशयित श्रुती घोडे हिच्या ताब्यातून ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, कानातील झुबे, कानातील चेन, कर्णफुले असे दोन लाख १२ हजार रुपये किमतीचे सात तोळ्याचे चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
Social Plugin