बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. जिल्ह्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे यांच्या मंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात विक्रमी मताधिक्यांनी विजयश्री खेचून आणणारे, कराड उत्तर आणि कोरेगाव मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपा आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पहिल्याच यादीत भाजपाचे नेतृत्व वर्णी लावेल असे राजकीय तज्ञांच मत आहे. जिल्ह्यात मंत्री पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यात मविआचा सुपडा साफ करण्यासाठी किंगमेकरची भूमिका बजावणारे खा. उदयनराजेंनी बजावली. कराड दक्षिण, कराड उत्तर या मतदार संघात आमदार बाळासाहेब पाटील, कराड दक्षिण मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढत्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी भाजपनं केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. नागठाणे, अतित, वर्णने जि. प. गट मतदार संघ पुनःरचनेपूर्वी सातारा मतदारसंघात होते.
या जि. प. गटावर उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोन मतदार संघांची जबाबदारी दोन्ही राजेंवर सोपवली होती. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंसाठी आ. मनोज घोरपडे, आ. अतुल भोसले यांनी रात्रंदिवस प्रचाराची धूरा सांभाळून मतांचा टक्का वाढवला होता. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंसाठी प्रचार हा दोन्ही आमदारांसाठी विधानसभेची रंगीत तालीम होती.
दोन्ही राजेंचे मनोमिलन फेव्हिकॉल सारखं पक्क झाल्याने या दोन मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून कमळ फुलवले. जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजे सध्या किंगमेकर ठरले आहेत.
शिवेंद्रसिंहराजेंनी गेल्या दोन वर्षांत भाजपाच्या सर्व उपक्रमात घेतलेला सहभाग, पक्ष नेतृत्वाने सोपवलेल्या जबाबदारी पार पाडल्या. राज्यातील सत्ता नाट्यानंतर मंत्री पदाची माळ गळ्यात पडेल अशी शक्यता होती. त्यावेळी त्यांना डावलण्यात आले. या निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्र असल्याने प्रचारासाठी कोणत्याही बड्या नेत्यांना प्रचारासाठी सभेची गरजच पडली नाही. खासदार उदयनराजे शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी जि. प., पं. स., नगरपालिकांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवेंद्रसिंहराजेंची वर्णी लावून "शिवरायांच्या गादीचा सन्मान करावा ही राजे समर्थकांची मागणी आहे.
जागा वाटपात कोरेगाव आणि पाटण मतदार संघ एकनाथ शिंदे शिवसेनेकडे आले होते. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा नारळ जिल्ह्यात पहिला कोरेगावात फोडला. पहिल्याच सभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना विजयी करा मंत्री पदाची जबाबदारी माझी असे आश्वासन दिले. सेनेच्या दोन्ही मतदार संघात ना. शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांनी घवघवीत यश मिळवले. शिंदे यांच्यावर शेवटच्या टप्प्यात पाटबंधारेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
शंभूराजे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय होते. शंभूराजेंवर सातारा आणि ठाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिंदे हे शंभूराजेंवर यावेळी पहिल्या पेक्षा मोठी जबाबदारी सोपविणार हे तितकेच सत्य आहे. या दोघांनाही मंत्री पदे देताना शिंदेना तारेवरची कसरत करावी लागेल. सेना नेते शिंदे शब्दांचे पक्के आहेत. या दोघांनाही संधी देताना शंभुराजेंना पुन्हा ठाणे पालकमंत्री जबाबदारी दिली जाईल हे नाकारता येत नाही.
सातारा, माण, कराड दक्षिण कराड उत्तर असे भाजपाचे चार आमदार आहेत. माणचे आ. जयकुमार गोरे यांनी स्वतःचा गड राखला पण रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या फलटण मतदार संघात कमळ फुलवण्यात सिंहाचा वाटा उचलला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून माजी खासदार रणजितसिंहांकडे पाहिले जाते. निंबाळकर यांचा पराभव फडणवीस यांच्या जिव्हारी लागला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी रामराजेंनी माजी आमदार दिपक चव्हाण, बंधू संजीव राजेंना यांना शरद पवार गोटात पाठवून नवे राजकीय समिकरण जुळविले होते. रणजित निंबाळकर यांच्या पराभवात रामराजेंचा हात होता. या दोन कारणांमुळे रामराजे फडणवीस यांच्यात वैचारिक मतभेद झाले.
रामराजेंनी विधानसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली परंतु पडद्यामागून सूत्रे हालवली. चव्हाण यांना पराभवाची धूळ चारून सचिन पाटील यांची विजयाची पताका फडकवला. अटीतटीच्या या लढतीत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला. यात जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा होता. माढा लोकसभा मतदार संघातील मोहिते पाटील यांचे वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी भाजपाला जयकुमार गोरेंना ताकद द्यावी लागेल. मंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला तर एकाच जिल्ह्यात दोन मंत्री पदे सोपवावी लागतील.
अजित पवार यांचे विश्वासू म्हणून वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या कडे पाहिले जाते. मकरंद पाटील यांना गतवेळीच पवार संधी देतील असं वाटतं होते. राष्ट्रवादी जिल्ह्यात वाढवायची असेल तर पाटीलांना संधी द्यावी लागेल. सगेसोयरे म्हणून पवार पाटील घराणे गुंतलेले आहेत. राज्यसभेवर नितीन पाटील यांना संधी दिली आहे. मंत्री पदाची संधी वाई मतदार संघात द्यावी लागेल.
मविआचा सुपडा साफ करणाऱ्या या जिल्ह्यात मंत्री पदाची संधी देताना पक्ष नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंना कॅबिनेटची संधी देऊन "गादीचा" सन्मान करून जनमानसात वेगळा संदेश दिला जाईल असा राजकीय तज्ञांच मत आहे. शंभूराजे मंत्री पदात पहिल्या यादीत फिक्स आहेत. जयकुमार गोरेंची आक्रमकता, माढा लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदारीसाठी पक्ष नेतृत्वाला विचार करावा लागेल. मकरंद पाटील आणि महेश शिंदे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकली जाईल असं बोललं जात आहे.
सातारा जिल्ह्यात मंत्री पदासाठी चार आमदारांच्या नावाची चर्चा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांनी मतदाराना मंत्री पदाचा शब्द दिला आहे. मतदारांनी मतदारांचे भुमिका चोख बजावली. यापुढे दिलेला शब्द पाळताना पक्ष नेतृत्वाचा कसं लागणार आहे एवढं मात्र निश्चित.
Social Plugin