बुध दि[ प्रकाश राजेघाटगे ]
मागील विधानसभा निवडणुकीत कोरेगावात मोठी रंगतदार लढत पाहायला मिळाली होती, पाच वर्षानंतर काही फरक न होता परत तीच लढत रंगतदारपणे होणार असे दिसून येत आहे. कोरेगाव तालुक्याच्या राजकीय इतिहासात सन 2019 साली पहिल्यांदाच काँग्रेसतर विचारसरणीचा आमदार म्हणून श्री महेश शिंदे निवडून आले त्यावेळेस त्यांनी हेवीवेट आमदार व माजी मंत्री श्री शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला होता. गेल्या पाच वर्षात अनेक स्थित्यंतरे राज्याच्या राजकारणात आली. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन प्रादेशिक पक्षांची दोन भागात शकले झाली. एवढं सारा रामायण घडवून सुद्धा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडली. आता सहा महिन्यानंतर चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे सांगणे कठीण झाले आहे त्यामुळे प्रत्येक जागा दोन्ही आघाडी व युती निकराने लढत आहे त्यामुळे कोरेगाव मतदार संघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
*सलग तीन पराभव*
मागील पाच वर्षे सोडता सलग 20 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले श्री शशिकांत शिंदे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि जणूकाही त्यांच्या मागे शुक्लकाष्टच लागले. नंतर झालेल्या जिल्हा बँक निवडणूक व थोड्या दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्री शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला. खरे तर श्री शशिकांत शिंदे यांना त्यांच्या राजकीय कार्यकालात सलगपणे पराभव होईल असे स्वप्नासुध्दा वाटले नसेल परंतु नियतीपुढे कुणाचे काहीच चालत नाहीत असेच म्हणावे लागेल.परंतु त्यांनी लढाऊ बाणा जागृत ठेवून परत एकदा शड्डू ठोकून विधानसभेचे मैदान दणाणून सोडले आहे.
*विद्यमान लोकप्रतिनिधी चढता आलेख*
श्री महेश शिंदे हे आमदार झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करत आहेत.जागतिक कोरोना महामारीत सुध्दा त्यांनी रूग्णसेवेस मतदारसंघात कुठेही कमतरता येऊ दिली नाही.चार कोविड सेंटर चालू करून तालूक्यातील जनतेची सेवा केली.तसेच मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांनी मोठा विकासनिधी आणला असे ते गवगवा करतात.तसेच चालू कारकीर्दीत शेवटी त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष देऊन ताकद देण्याचा प्रयत्न झाला.त्यांच्या या पाच वर्षात जिहे-कठापूर योजना कार्यान्वित झाली हे विशेष....
*राजकीय उलथापालथ*
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत.मा.सभापती भास्कर कदम यांनी श्री.शशिकांत शिंदे यांची साथ सोडून विद्यमान आ.श्री.महेश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला तर मा. जिल्हा सदस्य श्री.शिवाजीराव महाडिक,किशोर बाचल यांनी श्री.महेश शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.मागच्यावेळी प्रमाणे यावेळी माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील यांचा गट श्री.शशिकांत शिंदे यांच्या विरोधात काम करत आहे.आणि यावेळी महायुतीच्या माध्यमातून खासदारकी भेटली असल्यामुळे खा.नितीन पाटील हे जातीने लक्ष ठेवून आहेत.तर शशिकांत शिंदे यांच्या गटाचे जिल्हा बँकेचे संचालक असलेले श्री.प्रदीप विधाते हे राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसून येत नाहीत हे विशेष नमूद करावे लागेल.ऐवढे असूनही श्री.शशिकांत शिंदे आपला राजकीय मुत्सद्दीपणाचा पुरता वापर करून एकाकी खिंड लढवत आहेत.
*शरद पवार यांची सभा अन्...*
सातारा जिल्ह्याने श्री.शरद पवार यांच्यावर अतोनात प्रेम केले आहे.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर श्री.शरद पवार यांनी जिल्ह्यात जो झंझावात निर्माण केला त्यात जिल्ह्यातील विरोधी पक्ष नेस्तानाबूत केला होता.आता सुध्दा मुळ पक्षाची शकले होऊन सुध्दा पवार साहेब लोकसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळवले.वर्तमानात विधानसभा निवडणूकीत लोकसभेप्रमाणे यश मिळविणे त्यांना क्रमप्राप्त झाले आहे.पण यावेळी सातारा लोकसभेत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला.ज्या जिल्ह्याने पवार साहेब यांच्यावर उत्कट प्रेम केले तेथे त्यांचाच शिलेदार पडतो हे त्यांनासुध्दा विचारात पाडणारे आहे.त्यामुळे श्री.शरद पवार यांची सभा आणि वातावरण पलटी हे आतासुध्दा होते की नाही हेही पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे पण यावेळी येणारा कोरेगांव तालुक्याचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणार हे दिसून येत आहे.
*खा.उदयनराजे यांचे जातीने लक्ष*
लोकसभा निवडणूकीत कोरेगांवसह अन्य मतदारसंघात आ.महेश शिंदे मोलाची कामगिरी बजावली होती.त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत श्री.महेश शिंदे यांच्यासाठी खा.उदयनराजे जातीने लक्ष ठेवून आहेत.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी भाजपाकडून फक्त खासदारांची उपस्थिती सर्व काही सांगून जाते.
Social Plugin