छायाचित्र -बिटलेवाडी (ता. खटाव): गुडघ्याएवढ्या पाण्यातून सोयाबीन बाहेर काढता काढता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. छाया - प्रकाश राजेघाटगे |
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
यंदा पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने सोयाबीन, घेवडा, बटाटा या खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्याच्या हाताला जे काही सोयाबीनचे थोडेफार उत्पन्न लागले, ते शेतकऱ्याने कसेबसे पदरात पाडून घेतले. उत्पादन कमी झाल्याने बाजारात चांगले दर मिळतील, ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण काढणी होऊन दोन महिने झाले, तरी सोयाबीनचे दर सोडचार हजारांवर गेलेले नाहीत.
सध्या शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे, तर व्यापाऱ्यांकडून तीन हजार ७०० ते चार हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत असून, ही लूटच सुरू असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आहे.
खटाव तालुक्यात यंदा सोयाबीन उत्पादकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. सोयाबीन काढणीला आले अन् पावसाने धुमाकूळ घातला. त्यात अतिवृष्टीमुळे वाचलेले सोयाबीन कसेबसे काढून बाजारात विक्रीसाठी आणले, तर त्यालाही केवळ चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल या कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही. घेवडा आणि बटाटा पूर्णतः मातीमोल झाले. त्यातल्या त्यात हलक्या रानातले जे काही थोडेफार सोयाबीन राहिले, ते देखील गुडघ्याएवढ्या पाण्यातून बाहेर काढता काढता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. आता त्याला दर नसल्याने शेतकऱ्याला नाइलाजाने कवडीमोल भावाने व्यापाऱ्याला विकावे लागले.
एका बाजूला खाद्यतेलाचे वाढते दर आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीन कवडीमोल भावाने खरेदी होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकरी नऊ ते १० क्विंटल सोयाबीन उत्पन्न काढले होते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी सोयाबीन पिकांत साचल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. जे थोड्याफार प्रमाणावर आले ते म्हणजे एकरी एक किंवा दोन क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी खर्चही निघणे कठीण होऊन बसले. सद्यःस्थितीत सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच पेरणीच्या वेळेस झालेला खर्च, त्यानंतर वेळोवेळी टाकलेले खत, बी-बियाणे याचावर झालेला खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे.
आता शेत रिकामे करण्यासाठी हार्वेस्टिंग खर्च करावा लागत आहे. हमीभाव केंद्र सुरू करून बाजार समिती आवार, तसेच तालुक्यात्तील परवानाधारक खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
खटावमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार सोयाबीन खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील कन्हाड, कोरेगाव व फलटण येथील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. यामुळे खटाव तालुक्यातही खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती.
Social Plugin