बिटलेवाडी: येथील शेतकरी रामदास बिटले यांच्या शेतातील बटाटा सततच्या पावसाने नासल्याने उकिर्ड्यात फेकून द्यावा लागला. छायाचित्र - प्रकाश राजेघाटगे बुध |
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
महाळाच्या पंधरवड्यापासून सतत पडत असलेल्या पावसाने खरीप पिके धोक्यात आली आहेत. सततच्या पावसाने शेतामध्ये तळी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काढणीस आलेले सोयाबिन, मका, बाजरी व बटाटा , आले आदी पिके कुजायला व नासायला लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे.
गेला महिना तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने खरिपात लागवड केलेल्या व काढणीला आलेल्या सोयाबीन, आले, बटाटा , घेवडा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गांवात शेतकऱ्यांना बटाटा नासल्याने उकिर्ड्यात फेकून द्यावा लागला तर सोयाबीनला मजूर मिळत नसल्याने शेतात फुटू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात हजारों हेकटरवरील पिके पाण्यात उभी आहेत. शेतकऱ्याला शेतात पीक काढण्यासाठी शेतात शिरण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. सोयाबीन, बटाटा,घेवडा, आले या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरं तर या पिकांवरच या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून असते. यंदा पावसामुळे हंगाम हातून निसटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात अतिृष्टीमुळे शेतजमिनी खरवडून गेली आहे.
बाबुराव जाधव, सरपंच गादेवाडी (ता. खटाव) यांनी सांगितले की पावसाने कहर केल्याने हंगाम हातून निसटला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यात भरीस भर म्हणजे मजुरांची मोठी समस्या जाणवते. बाहेर गावाहून मजूर आणावे लागत आहेत.सोयाबीन काढण्यास व ढीग रचून ठेवण्यासाठी मजूर एकरी सरासरी सहा ते सात हजार रुपये घेत आहेत. बटाटा पीक भांडवली असून कर्ज काढून घेतलेले पीक काढणीच्या वेळी नासल्याने शेतकऱ्यांचा बाजार उठला आहे."
Social Plugin