बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर या शाळा प्रवेश दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेमार्फत वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सहभागी होत असतात. नियोजनाप्रमाणे यावर्षी केंद्रस्तर व तालुकास्तरावर यशस्वी झालेल्या स्पर्धकांची जिल्हास्तरावर दिनांक 18 ऑक्टोबर रोजी स्पर्धा संपन्न झाली.
ज्या शाळेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्या प्रतापसिंह हायस्कूल सातारा या ठिकाणी संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर ता. खटाव या शाळेचा इयत्ता सातवीतील अमेय विकास फडतरे यांने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित तीन वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपले मत सादर करावयाचे होते. नशीब चिट्ठीद्वारे मिळालेल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अमेय फडतरे यांने अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे आठ मिनिटांचे भाषण केले. आवाजातील चढउतार, विषयानुरूप मांडणी व विविध उदाहरण दाखल्यांद्वारे सादरीकरण देत अमेयने केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याला हे यश संपादन करता आले.
यापूर्वी अमेयने इयत्ता पाचवी मध्ये शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला असून जिल्हास्तरावर मिळवलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्ताराधिकारी संगीता गायकवाड, चंद्रकांत सुतार, केंद्रप्रमुख अजित निकाळजे यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले आहे.
अमेयला या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव कदम, उपक्रमशील शिक्षक विनोद गोडसे, अजित चव्हाण, सुवर्णा घनवट, वैशाखी साबळे, सपना राऊत, अमित भिसे तसेच स्वयंसेवीका धनश्री तापोळे व अमृता शेवते या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
Social Plugin