नाशिक प्रतिनिधि अमन शेख
माजी मंत्री बबनराव घोलप हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असून या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला देवळाली मतदारसंघात खिंडार पडणार आहे.बबनराव घोलप हे देवळाली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर पाच वेळा निवडून आले होते, तर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे सुद्धा एक वेळा निवडून आले आहेत.
गेल्या आठ महिन्यापूर्वी बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीचा प्रचार सुद्धा केला होता. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बबनराव घोलप यांना शिंदे गटाकडूनही डावलले जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये पुन्हा अजित पवार गटाला मिळणार असल्याने घोलप हे नाराज झाले आहे.
तर महाविकास आघाडीमध्ये देवळाली मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला न मिळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तब्बल वीस उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धेत आहे. असे असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित केला जात नाही. परिणामी आता बबनराव घोलप यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन देवळाली मतदारसंघाबाबत चर्चा केली.
दरम्यान, सध्या देवळाली मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप प्रयत्नशील असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला एक प्रकारे मोठा धक्का बसणार आहे. प्रवेश कधी करणार याबाबत अद्याप तारीख निश्चित झाली नसली तरी प्रवेश हा नक्की होणार असल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले.
Social Plugin